जैनुद्दीन मुलाणी विठाई साहित्य साधना पुरस्काराने सन्मानित
पंढरपूर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव

पंढरपूर/प्रतिनिधी
गादेगाव ता. पंढरपूर येथील समाजरत्न
पुरस्कार प्राप्त व विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्यामुळे सर्वपरिचित असलेले जैनुद्दीन मुलाणी यांना, विठाई साहित्य साधना या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. तपोवन बहुद्देशीय संस्था व विठाई वारकरी गुरूकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये जैनुद्दीन मुलाणी यांना माजी आ. दिपकआबा साळुंखे-पाटील, पुणे विभागीय शिक्षक माजी आ. दत्तात्रय सावंत, ह.भ.प. चवरे महाराज, यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष समाधान काळे, धाराशिव युनिटचे कार्यकारी संचालक अमर पाटील, विठ्ठलचे तज्ञ संचालक प्रा. तुकाराम मस्के, दिनकर दाजी चव्हाण, जेष्ठ समाजसेविका चंदाताई तिवाडी , मारूती जाधव, प्रा. सुनिल अडगळे सर, कार्यक्रमाचे संयोजक ह.भ.प. सुर्याजी महाराज भोसले, ह.भ.प. माधुरी सुर्याजी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.
मुलाणी यांनी गेल्या ३० वर्षांत वृक्षारोपण व संवर्धन, स्त्री भ्रुण हत्या-एक सामाजिक समस्या जनजागरण अभियान, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मुल्यांकन कमिटीत निवड व महाराष्ट्रातील ६० गावाना भेटी देवून मुल्यांकन केले. आषाढी यात्रा सोहळ्यामध्ये सतत ५ वर्षे वृत्तसंकलन व छायाचित्रासाठी पायी वारी करून विविध आध्यात्मिक उपक्रमास प्रसिद्धी दिली. दर वर्षी ८ मार्चला महिला मेळाव्याचे आयोजन करून विविध उपक्रम सातत्याने राबवितात.
याशिवाय रक्तदान शिबीर, सर्वरोग निदान शिबीर, पल्स पोलिओ यासारखे विविध उपक्रम, आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबविले. सेवाभावी वृत्तीने समाजामधील विविध क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग तसेच उपेक्षित घटकातील मुला-मुलींना शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी व योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठीचे कार्य सातत्याने चालू आहे. अशा विविध उपक्रमातील कार्याची दखल घेवून, जैनुद्दीन मुलाणी यांना विविध सामाजिक संस्था व संघटनांनी आजपर्यंत ६५ जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.