
पंढरपूर (प्रतिनिधी)
शिवसेनेत फूट पडली, उद्धव ठाकरेंचे सरकार गडगडले. काय झाडी, काय डोंगर हा डायलॉग
प्रत्येकाच्या ओठावर येऊ लागला. पण या डायलॉगने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची झोप उडवली होती. यामुळेच सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. पण म्हणतात ना, दिस जातील दिस येतील .. याप्रमाणे पुन्हा परीक्षेचे दिवस आले आहेत. आ. शहाजीबापू पाटील आणि उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा.
सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत , उद्धव ठाकरेंसाठी सांगोला मतदारसंघ अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. शिवसेनेची उमेदवारी घेऊन आ.शहाजीबापू पाटील मागील निवडणुकीत निवडून आले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेशी फारकत घेतली होती. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी केलेली डायलॉगबाजी शिवसेना प्रमुखांच्या हृदयात भेद करून गेली होती. मी शिवसेनेच्या मतांवर निवडून आलोच नाही, अनेक राजकारण्यांनी मदत केली असल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही तोंडसुख घेतले होते.
आता पुन्हा परीक्षेचे दिवस आले आहेत. विधानसभा निवडणूक लढवण्याची परीक्षा प्रत्येकाला द्यावी लागणार आहे. आ. शहाजीबापू पाटील हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात पुन्हा शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याचे मोठे प्रयत्न शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडीही करणार आहे.
यामुळेच मागील दोन दिवसात अजित पवार राष्ट्रवादी गटाचे दीपकआबा साळुंखे यांचा मातोश्रीवर शिवसेना प्रवेश झाला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे हेही मातोश्रीवर उपस्थित होते. या प्रवेशाने आ. शहाजीबापू पाटील यांच्यासह अनेक राजकारण्यांची झोप उडाली. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सांगोला मतदारसंघात पुन्हा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. माजी आ. दीपकआबा साळुंखे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात पुन्हा भगवा फडकवण्याच्या तयारीत आहेत.
याचवेळी आ. शहाजी बापू पाटील यांनी निवडणुकीसाठी पुन्हा चंग बांधला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे जिगरबाज राजकारणी आहेत. आ. शहाजीबापू पाटील हे सत्तांतर काळात शिवसेनाप्रमुखांच्या नजरेत आले होते. यामुळेच त्यांनी सांगोला विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वळवले आहे . या निवडणुकीत पुन्हा भगवा फडकणार की, शहाजीबापू पाटील यांनाच येथील मतदार थारा देणार, याकडे सबंध राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना सोडून गेलेला नेता आजवर निवडणुकीत टिकला नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आ. शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. माजी आ. दीपकआबा साळुंखे यांना अजित पवार गटातून शिवसेनेत प्रवेश देत , त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे . नागरिकांची सहानुभूती शिवसेनेला राहणार की ,आ. शहाजीबापू पाटील यांना, हे निवडणूक निकालानंतरच समजणार आहे.