
पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी अखेर अभिजीत पाटील गटात प्रवेश केला असून, य प्रवेशामुळे भोसे गटातील
राजकारणात मोठी खळबळ उडणार आहे.
हणमंत मोरे यांच्या या राजकीय गनिमी काव्याची चर्चा सबंध तालुक्यात पसरली आहे.
हनुमंत मोरे हे पंढरपूर तालुक्यातील भोसे गावचे रहिवाशी आहेत. पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. मागील काही दिवसापूर्वी त्यांनी
या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु आजतागायत काँग्रेसकडून हा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. गेल्या दहा ते बारा दिवसापूर्वी त्यांनी आपली भूमिका दोनच दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया पत्रकार परिषद घेऊन दिली होती. या काळात महायुतीसह महाविकास आघाडीचे
अनेक नेते मंडळी त्यांच्या संपर्कात होते. महाविकास आघाडीचे नेते अभिजीत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला.
आणि तालुक्यात चर्चेला मोठे उधाण आले होते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
अभिजीत पाटील हे अनेक दिवसापासून हनुमंत मोरे यांच्या संपर्कात होते. भारतीय जनता पार्टी, मोहिते पाटील गट, धवलसिंह मोहिते पाटील गट इत्यादी अनेक राजकीय गटांशी त्यांचा संपर्क सुरू होता. अखेर
शुक्रवार दि. ३ मे रोजी त्यांनी अभिजीत पाटील गटात प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश तात्या सावंत आणि साळुंखे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. येत्या ५ मे रोजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांचा प्रवेश अभिजीत पाटील गटात होणार आहे. त्यांच्या या राजकीय गनिमी काव्याची चर्चा भोसे परिसरात पसरली.
हनुमंत मोरे यांनी आजतागायत कल्याणराव काळे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असा राजकीय प्रवास केला आहे. भोसे जिल्हा परिषद गटात त्यांचा मोठा प्रभाव आहे. काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ,सचिव , माढा तालुका काँग्रेसचे निरीक्षक, पंढरपूर तालुक्याचे अध्यक्ष अशी अनेक पदे यापूर्वी भूषवली आहेत. त्यांच्या या राजकीय अनुभवाचा फायदा अभिजीत पाटील गटाला निश्चितच होणार आहे.
अभिजीत पाटील गटात भरती सुरूच
अभिजीत पाटील यांचा गट पंढरपूर, मंगळवेढा, माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे.
आता शरद पवार राष्ट्रवादी पार्टीकडून महायुतीच्या सावलीत आलेल्या या गटात आजही भरती सुरूच असल्याचे मोरे यांच्या प्रवेशावरून दिसून येत आहे.