
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,अभिजीत पाटील यांनी अखेर उमेदवारी अर्ज विकत घेतला असून, हा उमेदवारी अर्ज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावे घेण्यात आला आहे. यामुळे अभिजीत पाटील यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीची लॉटरी लागते की काय,अशी चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे.
माढा विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमधील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. यामुळे या मतदारसंघातून स्वतः आ. बबन दादा शिंदे, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, रणजीतसिंह शिंदे, संजय कोकाटे इत्यादी मंडळींनी उमेदवारीची मागणी या पक्षाकडे केली आहे. आ. बबनदादा शिंदे यांनी तर अचानक अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. त्यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
दरम्यान अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. हा उमेदवारी अर्ज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावे घेण्यात आला आहे. यामुळे या मतदारसंघात अभिजीत पाटील यांच्या हातात तुतारी येते की काय ? अशी चर्चा मतदारांमधून रंगू लागली आहे.