पंढरपूर (प्रतिनिधी)
सबंध महाराष्ट्रातून शरद पवार यांच्याकडे उमेदवारीसाठी नेते मंडळींची रीघ लागली असताना,
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्या उमेदवाराची घोषणा होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. माजी आ. प्रशांत परिचारक यांच्याही नावाचा जोर सध्या सुरू आहे. परंतु खुद्द प्रशांत परिचारक यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. किंबहुना राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची भेट प्रशांत परिचारक यांनी घेतलेली नाही. परिचारक समर्थकांनी उमेदवारीची मागणी पवार यांच्याकडे केली आहे. ऐनवेळी परिचारक यांनी माघार घेतल्यास राष्ट्रवादीकडे कोणताही प्रबळ उमेदवार
शिल्लक राहिलेला नाही, यामुळे या मतदारसंघात ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसण्याची मोठी चिन्हे निर्माण झाली आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांनी आ. अवताडे यांच्याशी निकराची झुंज देऊन, निसटता पराभव स्वीकारला होता. परंतु त्यावेळीची राजकीय स्थिती सध्या राहिलेली नाही. भगीरथ भालके यांनी बीआरएस, समविचारी आघाडी यांच्या माध्यमातून त्यांच्याच समर्थकांची नाराजी ओढवून घेतली आहे.
यामुळेच मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे, दुसरे संभाव्य उमेदवार अनिल सावंत यांच्या पाठीशी भगीरथ भालके यांच्या समर्थकांची गर्दी आहे भगीरथ भालके यांच्या समर्थकांमध्ये फूट पाडण्याचा राजकीय अंदाज कोणाचा आहे ? राष्ट्रवादीला ऐनवेळी भगीरथ भालके हे उमेदवार मिळाले तर, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे समर्थक कमीच असणार आहेत, या समर्थकांमध्ये पद्धतशीर विभागणी करण्याचा राजकीय डाव करण्यात आल्याचे दिसत आहे. यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीचे प्रशांत परिचारक यांच्याबरोबर सूत न जुळल्यास, आ. समाधान आवताडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करण्याची रणनीती अगोदरपासूनच आखण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांना प्रबळ उमेदवार देण्यात अडचण येणार आहे. साहजिकच या मतदार संघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वरचेवर कमी होत असून , याचा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीतून बसणार आहे.