
पंढरपूर (प्रतिनिधी)
जीबीएस साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन सज्ज आहे, पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, आशा वर्कर्स ताईंच्या मार्फत सर्व्हे सुरू आहे, पाणी तपासणी, अन्न पदार्थ तपासणे, मोहीम हाती घेतली जाईल, दूषित पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आ. समाधान आवताडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
पंढरपूर शहरात नुकतेच जीबीएसचे दोन रुग्ण आढळले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी आ. आवताडे यांनी प्रशासनाची बैठक , पंढरपूर शासकीय विश्राम गृह येथे घेतली. या बैठकीस प्रांताधिकारी बी.आर. माळी, तहसीलदार सचिन लगोटे, मदन जाधव, पंढरपूर सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकारी डॉ. महेश सुडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, नगरपालिका उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.
प्रारंभी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकारी महेश सुडके यांनी जीबीएस साथीच्या बाबतीत माहिती दिली. त्याचबरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी, पंढरपूर नगरपालिका उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी शहरातील नियोजनाची माहिती दिली.
यावेळी पुढे बोलताना आ. आवताडे म्हणाले की, पंढरपूर शहरात दोन जीबीएसचे दोन रुग्ण सापडले आहेत. नुकतीच माघी यात्रा संपन्न झाली, तसेच शनिवार, रविवारी शहरात लाखावर भाविक येत असतात. पुणे, मुंबई येथील जीबीएस साथीचे रुग्ण वाढलेले आहेत. या पाश्वभूमीवर जीबीएस चा प्रादुर्भाव वाढू नये , यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका प्रशासनाने दक्षता घ्यावी. हा रोग मुख्यतः पाणी आणि अन्नातून प्रसारित होतो, हे लक्षात घेता पिण्याच्या पाण्याच्या योजना भीमा नदीवर अवलंबून आहेत, या पाण्यावर योग्य त्या तपासण्या करण्यात याव्यात, पाणी शुद्धीकरण करण्याचे काम केले जावे, अशा सूचना केल्या.