स्वेरीचे तंत्रशिक्षणात उल्लेखनीय कार्य – अनिल अग्रवाल
स्वेरीला अनिल अग्रवाल आणि प्रदीपकुमार धूत यांची सदिच्छा भेट

पंढरपूर (प्रतिनिधी)
स्वेरीला भेट देऊन आज मनापासून आनंद झाला, १९९८ साली सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत स्वेरीने तंत्रशिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोहचवले आहे. ग्रामीण भागात असून देखील स्वेरी उत्तरोत्तर उत्तम प्रगती साधत आहे. त्यामुळे ‘स्वेरीचे तंत्रशिक्षणातील कार्य उल्लेखनीय आहे. येणाऱ्या काळात स्वेरीच्या विद्यार्थ्यांना आमच्या उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी देण्याच्या दृष्टीने आम्ही नक्कीच पाऊले उचलू , असे प्रतिपादन वेदांता रिसोर्सेस लिमिटेडचे संस्थापक व चेअरमन अनिल अग्रवाल यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटला वेदांता रिसोर्सेस लिमिटेडचे संस्थापक व चेअरमन मा.अनिल अग्रवाल यांनी सपत्नीक , आणि व्हिडिओकॉन हायड्रोकार्बन होल्डिंग लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. प्रदीपकुमार धूत यांनी आज सदिच्छा भेट दिली. ‘आजी सोनियाचा दिनु l वर्षे अमृताचा घनु’ या उक्तीप्रमाणे उद्योग जगतातील भारताच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे , असे औद्योगिक जगताचे अनुभवी उद्योगनेतृत्व, उद्योग जगतात ‘मेटल किंग’ या नावाने ओळखले जाणारे वेदांता रिसोर्सेस लिमिटेडचे संस्थापक व चेअरमन अनिल अग्रवाल आणि व्हिडिओकॉन हायड्रोकार्बन होल्डिंग लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीपकुमार धूत यांनी माघी वारीच्या निमित्ताने, पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेतले. त्याचवेळी स्वेरी या संस्थेला देखील सदिच्छा भेट दिली.
युवा विश्वस्त मा. प्रा. सुरज रोंगे यांनी या भेटी दरम्यान स्वेरीच्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची, प्रकल्पांची व वाटचाली संदर्भात पाहुण्यांना माहिती दिली. शैक्षणिक क्षेत्रातील स्वेरीच्या योगदानाचे या मान्यवरांनी विशेष कौतुक केले. मॅनेजिंग डायरेक्टर मा. प्रदीपकुमार धूत हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘स्वेरीने अल्पावधीतच तंत्रशिक्षणात भरीव कार्य करत, ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे कार्य केले आहे.’ पंढरपूरला “आध्यात्मिक राजधानी” आणि “दक्षिण काशी” म्हणून ओळख मिळाली आहे, मात्र शिक्षणाच्या क्षेत्रातही पंढरपूरची ओळख निर्माण करण्यासाठी स्वेरी संस्था महत्त्वाचे कार्य करत आहे, याची नोंद उद्योगजगताच्या या मान्यवरांनी घेतली.
यावेळी उपप्राचार्या डॉ. सौ. मिनाक्षी पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ. अमरजीत केने, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. बादलकुमार, युवा उद्योजक निखील बागल, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम वर्ष इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.