
पंढरपूर (प्रतिनिधी)
माढा विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला असून, आ. बबनदादा शिंदे यांनी अजित पवार राष्ट्रवादीला राम राम ठोकत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी केली आहे. उमेदवारी नाही मिळाल्यास , अपक्ष लढण्याचीही तयारी ठेवली आहे. महायुतीतून ही जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात उमेदवारीची शोधाशोध सुरू झाली आहे. महायुतीची ही उमेदवारी अचानक कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
माढा मतदार संघात महाविकास आघाडीतून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, तर महायुतीतून
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष निवडणूक लढवणार आहेत. जागा वाटपात ही जागा दोन्ही
राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहेत. आ. बबनदादा शिंदे हे त्यांचे पुत्र, जिल्हा दूध संघाचे चेअरमन, रणजीतसिंह शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत. यासाठी त्यांनी अजित पवार गटाशी फारकत घेत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी केली आहे. गेल्या महिन्यापासून त्यांनी या पक्षाकडे उमेदवारीची मागणी लावून धरली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी नाही मिळाल्यास, प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी केली आहे. यामुळे अचानक अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला या जागेसाठी उमेदवाराची शोधाशोध करणे भाग पडले आहेत. आता या जागेवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला संधी देणार, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहेत.
आ. बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी फुटीच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार गटात दाखल झाले होते.यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली होती. परंतु अचानक आ. बबनदादा शिंदे यांनी महायुतीकडे पाठ फिरवली, आणि या जागी नवीन उमेदवाराचा शोध घेण्याची पाळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली.