शैक्षणिक

अरिहंत पब्लिक स्कूलच्या यशात शिक्षक आणि पालक वर्गाचा मोठा वाटा -डॉ. शितल शहा

अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये चांगला नागरिक घडतो- हभप जयवंत महाराज बोधले

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर शहरात नावलौकिक मिळवलेले अरिहंत पब्लिक स्कूल आजही पालकांना आपले वाटते. शिक्षकही स्वतःला झोकून देऊन काम करीत असतात, हा शिक्षक वर्ग आणि पालक वर्गच अरिहंत पब्लिक स्कूलला यशोशिखरावर घेऊन गेला आहे. या दोन्ही वर्गासआपला मानाचा मुजरा, असे उदगार संस्थेचे अध्यक्ष डॉ. शितल शहा यांनी काढले. पंढरपूर शहरातील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या अरिहंत पब्लिक स्कूलला १५ ऑक्टोबर रोजी ४९ वर्षे पूर्ण झाली. ५० व्या वर्षात पदार्पण करीत असताना, अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.शीतल शहा हे होते. पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, हभप जयवंत महाराज बोधले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना, डॉ. शितल शहा यांनी मागील ४९ वर्षात संस्थेला आलेल्या भल्या भुऱ्या आठवणींना उजाळा दिला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यासाठी पंढरपूर शहरातील अनेक नामांकित मंडळींची मदतही झाली आहे. अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये येणारा विद्यार्थी अगदी सहजरित्या शिक्षण पूर्ण करतो. शिक्षण घेताना विद्यार्थी कायम आनंदी राहतो. येथील शिक्षकही अध्यापनाचा आनंद घेत काम करीत असतात. अशा आनंदी वातावरणात अरिहंत पब्लिक स्कूलने मोठी प्रगती केली आहे. या प्रगतीच्या पाठीशी पालक वर्ग आणि शिक्षक वर्गाचे मोठे योगदान आहे. हाक मारेल त्या ठिकाणी उभे राहणारे पालक, आणि दिवस रात्र अध्यापनाचे काम झटून करणारे येथील शिक्षक, हेच या संस्थेच्या यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.

अरिहंत स्कूलमध्ये शिकून नोकऱ्या पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. परंतु त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे या शाळेत चांगला नागरिक घडतो, हीच सर्वात मोठी गोष्ट या शाळेत जपली जाते, असे उद्गार हभप जयवंत महाराज बोधले यांनी यावेळी काढले.

याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी उज्वल शहा, डॉ. सौ. शहा मॅडम, चंदाताई तिवाडी, कमलताई तोंडे,मुख्याध्यापिका बहिरट मॅडम, लोखंडे मॅडम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी अरिहंत पब्लिक स्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे मंडळींचा सन्मान शिक्षक स्टाफकडून करण्यात आला. पथसंचलन , स्वागत गीत आणि प्रार्थनेने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी धायगुडे आणि परिचारक यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका बहिरट मॅडम यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close