तीस वर्षे निवडून आणलं, आता विजय आपलाच – दीपकआबा साळुंखे पाटील
मंगळवारी सांगोल्यातून प्रचारास शुभारंभ

पंढरपूर (प्रतिनिधी)
सांगोला तालुक्याच्या राजकारणात गेली तीस वर्षे राजकारण केलं. प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. आता माझी पाळी आहे. येथील जनतेलाही माझी काळजी आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शब्द पाळला आहे. सांगोला येथील अंबिका देवीचे दर्शन घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक नेते मंडळी उपस्थित होती.
उमेदवारी माघारी घेण्याची मुदत संपली. निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात झाली. प्रचार कार्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे मंगळवार दि. ५ नोव्हेंबर या दिवशी सांगोला नगरीचे ग्रामदैवत
अंबिका मातेचे दर्शन घेऊन , महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी येथील नागरिकांना संबोधित केले.
सांगोला तालुक्याच्या राजकारणात मी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली. मी ज्या बाजूला , त्या बाजूचा उमेदवार विजयी ठरायचा. या सर्व निवडणुकांत मी प्रचारप्रमुख होतो. यामुळे
तालुक्यातील वाडी अन वस्तीही तोंडपाठ आहे.
यामुळे प्रत्येक नागरिकाची भावना मी ओळखून आहे. सांगोला तालुक्यातील जनता माझ्यावर भरभरून प्रेम करते, हे उमेदवारी अर्ज भरतानाच दिसून आले आहे. माझ्यावरील प्रेमाचा ट्रेलर जनतेने त्यावेळी दाखवला आहे. निवडणूक निकालानंतर सारा पिक्चरचं समोर येईल, अशी भावना दीपक साळुंखे यांनी बोलून दाखवली.
मागील विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे पाटील हे शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी उभे होते. यावेळी त्यांचा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क आला होता. या निवडणुकीपूर्वी अचानक मातोश्रीवरून निरोप आला. दीपक साळुंखे पाटील यांनी तातडीने मातोश्री गाठली. आणि हाती मशाल घेऊन मतदारसंघात परतले. दीपक आबांच्या या भूमिकेने राजकारण्यांमध्ये घबराट पसरली. आता त्यांची हीच उमेदवार सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच मित्र पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तालुकाप्रमुख अरविंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर धनंजय पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.