
पंढरपूर (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसं तसे पंढरपूर तालुक्यातील राजकारण ढवळू लागले आहे. लक्ष्मी टाकळी रोडवरील अतिक्रमणे हटविण्यावरून भगीरथ भालके यांनी
शिवसेना नेते महेश साठे यांच्या घरी मुख्यमंत्री जाणार असल्याचा संदर्भ जोडला होता. या त्यांच्या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळेच ही अतिक्रमणे काढली जात असल्याचा गैरसमज, येथील नागरिकांमध्ये पसरवला होता. यावर शिवसेना महेश साठे यांनी जोरदार प्रतिहल्ला केला.टाकळीतील अतिक्रमणे माझ्यामुळे निघत असतील तर, पंढरपूर शहरातील अतिक्रमणे कोण काढत आहे ? असा प्रतिसवाल करत भगीरथ भालके यांच्यावर हल्ला चढवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लक्ष्मी टाकळी येथील
माझ्या घरी येणार आहेत, याची कल्पना मला सुद्धा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा शासकीय दौरा आहे. या दौऱ्यात ते कोठे कोठे जाणार, हे तेव्हाच्या परिस्थितीनुसार ठरणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे माझ्या घरी येणार असल्याचा जावई शोध भगीरथ भालके यांनी कसा लावला ? असे सांगून त्यांनी, असले फुटकळ राजकारण करू नका, असा सल्लाही भालके यांना दिला आहे.
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील पंढरपूर ते लक्ष्मी टाकळी रोडवरील अतिक्रमणे हटवण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. वास्तविक पाहता हा रोड नव्याने मंजूर झाला आहे. हा मंजूर रोड सुमारे ते ३३ मीटर रुंद असून, या रोडच्या कामासाठी ही अतिक्रमणे काढण्याचा झपाटा प्रशासनाने लावला आहे. या प्रशासकीय मोहिमेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्ष्मी टाकळी दौऱ्याशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. घाणेरडे राजकारण करण्याचा उद्योग भगीरथ भालके यांनी सोडून द्यावा, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.