
वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ठराविक पंचनामे न करता, सरसकट पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी अभिजीत पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त पंढरपूर मंगळवेढा मोहोळ आणि माढा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाशी झगडत होते. यातून कशीबशी पिके हातातोंडाशी आली होती. यातच वादळी वाऱ्याचा तडाखा या शेतकऱ्यांना बसला, आणि पंढरपूर तालुक्यातील सुमारे १ हजार ते दीड हजार हेक्टर शेतीपिके उध्वस्त झाली. वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी, अशी मागणी विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पंढरपूर, मंगळवेढा, माढा आणि मोहोळ या तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, आणि शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी अभिजीत पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील करकंब, नांदोरे, पेहे, नेमतवाडी, शेवते, गोपाळपूर, मुंडेवाडी, अनवली तसेच इतर अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, खूपसंगी, मारापुर, अकोला, लक्ष्मी दहिवडी, मेटकरवाडी, आंधळगाव यासह इतर अनेक गावांमध्ये पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील खंडाळी, पापरी ,आष्टी, येवती आणि माढा तालुक्यातील परिते, मोडनिंब, टेंभुर्णी तसेच इतर गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरांचेही वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानीचे ठराविक पंचनामे न करता, सरसकट नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी आदेश देण्यात यावेत, अशी मागणी अभिजीत पाटील यांनी केली आहे.
अभिजीत पाटील यांनी संबंधित निवेदन ना. फडणवीस यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटून दिले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करत असल्याचे सांगितले. राज्य सरकार नुकसान भरपाई देण्यासाठी पूर्णतः सकारात्मक असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
विजेच्या धक्क्याने मयत आणि जखमींना मदतीची मागणी
मागील चार दिवसापूर्वी अवकाळी पावसामध्ये वीज पडून घडलेल्या दुर्घटनेत पंढरपूर तालुक्यातील एक महिला मयत झाली होती. याबरोबरच दोन महिला जखमी झाल्या होत्या. या महिलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी अभिजीत पाटील यांनी स्वतंत्र पत्र देऊन उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.