ईतरसामाजिक

माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले धर्मपुरी येथे स्वागत

पंढरपूर (प्रतिनिधी)

आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन, आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून, माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री पाटील यांच्यासह खा. धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर, माजी आ. रामहरी रुपनवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, अकलूजचे प्र. उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

पालकमंत्र्यांनी केले सारथ्य

धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माऊलीच्या रथाचे सारथ्य केले. रथामध्ये त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर गेले.

सातारा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप

सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी १०.४० वाजता धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र दुद्दी, मुख्य कार्यकारी अधिकारी यासणी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासह, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

*जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल नामघोषाने आसमंत दुमदुमला…****

टाळी वाजवावी, गुढी उभी रहावी,
वाट ती चालावी पंढरीची ! या संत वचनानुसार टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने जय हरी विठ्ठल… जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा… तुकाराम चा जयघोष करीत, वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता.

*वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज*

वारकऱ्यांसाठी फूट मसाजची व्यवस्था

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पालखी मार्गावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. हिरकणी कक्षाच्या माध्यमातून महिला वारकरी मंडळी तसेच लहान मुलांसाठी उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच वारकऱ्यांना पायी चालून त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारकरी भाविकांना वारीत कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. धर्मपुरी येथे पालखी अगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आहे. यामध्ये आरोग्य शिक्षण, लेक लाडकी, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती, स्वच्छ्ता या विषयांचा प्रामुख्याने समावेश होता.

*दर्शनासाठी भाविकांची गर्दी*

सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माऊलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता, पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती.

*नातेपुते येथे पालखीचा मुक्काम*

धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी नातेपुते कडे मार्गस्थ झाली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close