
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी भगिरथ भालके यांच्या गळ्यात पडली असून,या मतदारसंघात बहुरंगी
सामना रंगणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बुधवारी रात्री उशिरा भगीरथ भालके यांच्या उमेदवारीबाबत निर्णय झाला. या उमेदवारीमुळे माजी. आ. प्रशांत परिचारक यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मागील विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांनी महायुती पुढे मोठे आव्हान उभे केले होते. त्यांचा या निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. आता पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने या मतदारसंघाची धुरा त्यांच्या
खांद्यावर टाकली आहे.भगीरथ भालके हे कै. आ. भारतनाना भालके यांचे चिरंजीव आहेत.
त्यांनी मागील काळात मोठी राजकीय धरसोड केली. मागील वर्षी त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड केली होती. प्रशांत परिचारक यांच्याशी समझोता करून,
मंगळवेढ्यातील दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडी स्थापन केली होती. यामुळे त्यांच्याबाबत मतदारसंघात उलट सुलट चर्चा होत होत्या. आता पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने त्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. ही जबाबदारी ते कशा पद्धतीने पार पडतात,
यावर त्यांचे पुढील राजकारण अवलंबून आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आ. समाधान अवताडे, मनसेचे दिलीप धोत्रे,
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भगीरथ भालके,
हे सध्या निवडणूक रिंगणात असून, माजी आ. प्रशांत परिचारक यांच्याबाबत पांडुरंग परिवार शुक्रवारी आपला निर्णय ठरविणार असल्याची माहिती आहे. युवा नेते अनिल सावंत
हेही निवडणूक रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत.
यामुळे या मतदारसंघात बहुरंगी सामना पहावयास मिळण्याची शक्यता आहे.