
काँग्रेसच्या माथाडी सेलचे
जिल्हाध्यक्ष, पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील
अशोक पाटोळे यांनी अचानक काँग्रेसला राम राम ठोकून, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. बुधवारी त्यांनी महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या रोपळे येथील सभेत पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनीच भाजपाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे, त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत महायुती उमेदवाराला जवळ केले आहे.
मागील काही महिन्यांपूर्वीच
त्यांच्याकडे काँग्रेस माथाडी सेलचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले होते. माथाडी विभागात त्यांचे मोठे काम होते. मुळातच जनसेवा संघटनेचे काम करणारे अशोक पाटोळे हे
धवलसिंह मोहिते पाटील
यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश
केल्यामुळे, त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अशोक पाटोळे हे पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावचे
व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यामुळेच रोपळे गावची ग्रामपंचायत आजही तेथील पाटील गटाकडे असल्याचे बोलले जाते.
मातंग समाजातील उमदे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मागील काही दिवसांपूर्वी महादेव वाघमारे यांच्या न्यायालयीन कस्टडीतील
मृत्यूप्रकरणी ४० तास
बेमुदत आमरण उपोषण करून त्यांनी प्रशासनात खळबळ उडवून दिली होती. मातंग समाजातील
घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागा मिळवून देण्याचे त्यांनी मोठे काम केले आहे. अनेक शासकीय योजना मातंग समाजाच्या घरादारापर्यंत पोचवल्या आहेत. यामुळेच मातंग समाजामध्ये त्यांना मोठे स्थान आहे.
पंढरपूर तालुक्यातील मातंग समाजाच्या या नेत्याच्या काँग्रेस सोडण्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नुकसान होणार आहे.
महायुतीच्या उमेदवारासाठी मात्र ही मोठी गोष्ट असल्याचे रोपळे परिसरातून बोलले जात आहे.
चौकट
रोपळे येथील काँग्रेसचे नेतृत्व अशोक पाटोळे यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत , महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. धवलसिंह मोहिते पाटील यांनीच भाजपला पाठिंबा दर्शवल्यामुळे, ही गोष्ट घडली असून, जनसेवा संघटनेतील एकजूट या घटनेमुळे दिसून आली आहे.