
पंढरपूर (प्रतिनिधी)
माढा विधानसभा मतदारसंघात, उमेदवारीच्या शर्यतीमुळे मोठ्या गोंधळाची परिस्थिती होती. या गोंधळाच्या परिस्थितीमुळे निवडणुकी आधीच रंगत आली होती. अखेर शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले, आणि प्रत्येकाचाच निवडणुकीचा मार्ग रिकामा झाला. प्रतिस्पर्धी उमेदवार आणि राजकीय पक्षामुळे ही निवडणूक, रणजीतसिंह यांना जड जाईल, असे वातावरण तयार करण्यात. विरोधकांना यश मिळाले. परंतु ३० वर्षे या मतदारसंघावर सत्ता गाजवलेल्या आ. बबनदादा शिंदे यांना ही निवडणूक हाताळणे तितकेसे अवघड नक्कीच नाही.
माढा विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून, रणजीतसिंह शिंदे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांच्या विजयासाठी आ. बबनदादा शिंदे हे प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. निवडणूक रिंगणात तुतारीसाठी चढाओढ निर्माण झाली होती. अखेर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हाती तुतारी लागली, आणि शिंदे कुटुंबाने काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रणजीतसिंह शिंदे यांनी मोठी रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत झालेल्या गर्दीमुळे शिंदे कुटुंब आनंदी झाले. आ. बबनदादा शिंदे यांनी या मतदारसंघावर कधी अपक्ष तर कधी पक्षातून निवडणूक लढवीत ३० वर्षे अधिराज्य केले आहे. या ३० वर्षाच्या काळात त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक नागरिक हाताळला आहे. गावागावात त्यांचे समर्थन करणारी मंडळी कार्यरत आहेत.
ही विधानसभा निवडणूक थोडीशी वेगळी आहे. शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट या निवडणुकीत पहावयास मिळत आहे. म्हणून तर तुतारी चिन्ह घेण्यासाठी या मतदारसंघात मोठी रस्सीखेच दिसून आली. निवडणूक काँग्रेसकडून लढवण्याचा निर्णय घेऊन शिंदे कुटुंब कामास लागले आहे. ही निवडणूक प्रतिस्पर्धी उमेदवार अभिजीत पाटील यांच्यामुळेही गाजली आहे. परंतु आजवरच्या निवडणुकांचा अनुभव शिंदे कुटुंबास मोठा आहे. गावागावात असलेले त्यांचे समर्थक आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. असे असताना, ही निवडणूक जरी खडतर वाटत असली तरीही, शिंदे कुटुंबासाठी कठीण मात्र नक्कीच नाही.