
पंढरपूर (प्रतिनिधी)
यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यासाठी, मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येणार आहेत. भाविकांची वाढती संख्या विचारात घेऊन, त्यांना आवश्यक त्या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवाव्यात. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
आषाढी वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस , खा. प्रणिती शिंदे, आ. समाधान अवताडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, यांच्यासह प्रशासनातील इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून, त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी, मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य सुविधांची उपलब्धता करावी, पालखी सोहळ्यांना पालखी मार्गाबरोबरच पालखी तळावर कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी, वारकऱ्यांसाठी सर्व सुविधांची कामे पूर्ण करावीत. अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत मान्यवरांनी केलेल्या सूचनानुसार आवश्यक सर्व सोय व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालखी सोहळा प्रतिनिधी आणि वारकरी भाविकांनी काही मागण्या केल्या. यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरातील अतिक्रमणे काढताना संबंधितांना नोटीस देऊन काढावीत, तसेच त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असेही यावेळी सांगितले. आ. समाधान अवताडे यांनीही यासंदर्भात अतिक्रमण धारकांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.