अनेक पक्षांची चव चाखलेल्या उमेदवाराला जनता जागा दाखवणार – खा. अमोल कोल्हे
खा. अमोल कोल्हे यांची पंढरपुरात पत्रकार परिषद

पंढरपूर (प्रतिनिधी)
काँग्रेस बीआरएस आणि पुन्हा काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेला उमेदवार काँग्रेसचा उमेदवार म्हणून पंढरपूर मतदारसंघात उभा आहे.
पंढरपूर मंगळवेढ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. यामुळे अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असून, अनेक पक्षात फिरून आलेल्या या उमेदवाराला जनताच जागा दाखवेल,
असे वक्तव्य खा. अमोल कोल्हे यांनी केले. पंढरपूर येथे मंगळवारी त्यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.
मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या खा. अमोल कोल्हे यांनी पंढरपुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या उमेदवारीची त्यांनी खिल्ली
उडवली. याप्रसंगी उमेदवार अनिल सावंत,
यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटात प्रवेश करणारे दहा नगरसेवक उपस्थित होते.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीप्रमुख शरद पवार यांची सभा होणार नाही, अशी अफवा पसरवण्यात आली होती. या अफवेस खा. अमोल कोल्हे यांनी पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यापैकी कोणाची सभा पंढरपुरात घ्यायची, याबाबत विचार सुरू आहे. नक्कीच कोणाची तरी सभा पंढरपूरत होणार आहे. अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. येथील मतदारांनी कोणतीही शंका बाळगू नये, अनेक पक्षांची चव चाखलेल्या उमेदवारास काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. नक्की ते काँग्रेसचे उमेदवार आहेत का ? हे काँग्रेसने तपासून पहावे, अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी लगावली. यावेळी अनिल सावंत यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिलेल्या पंढरपुरातील नगरसेवकांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.