अनिलनगर मधून पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची पडली ठिणगी !
दोन आमदार आणि साखर कारखानदारांनी कंबर कसली ...

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मधील अनिल नगर हे कायमच बंडखोरी विचारांचे केंद्र राहिलं आहे. याच अनिल नगर मधून पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची ठिणगी पडली.
नगरसेवक प्रताप गंगेकर यांचे पुत्र अक्षय गंगेकर यांनी सोमवारी हा मुहूर्त साधून आणला. माढा आणि मोहोळ तालुक्यातील सत्ता केंद्रांना हादरा देणारे दोन महारथी आ. अभिजीत पाटील आणि आ. राजू खरे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती.त्यांच्या जोडीला दुसरे साखर कारखानदार अनिल सावंत हेही हजर होते. पंढरपूर नगरपरिषदेवरील सरंजामशाही
उध्वस्त करण्याचा विडाच दोन आमदार आणि दोन साखर कारखानदारांनी उचलला. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग निवडणुक जाहीर होण्याअगोदरच, या ठिकाणावरून फुंकण्यात आले.
पंढरपूर शहरातील अनिल नगर येथे नगरसेवक प्रताप गंगेकर आणि त्यांच्या कुटुंबाने , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन आमदारांचा सन्मान सोहळा , सोमवार दि. २७ जानेवारी रोजी अनिल नगर येथे आयोजित केला होता. या सत्कार समारंभ सोहळ्यास पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई गंगेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर भोसले , नगरसेविका रंजनाताई पवार , काँग्रेसचे नागेश गंगेकर, अमर सूर्यवंशी , समाजसेविका भारतीताई गंगेकर, अनुराधा वाडेकर, सुनंदाताई उमाटे आणि शुभांगी ताई भोईटे, अक्षय गंगेकर, विवेक गंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंढरपूर शहराच्या प्रभाग एक मधून पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर पक्षांकडून रणशिंग फुंकण्यात आले. माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी माढा माढा तालुक्यातील , सत्तास्थानास हादरा देऊन , आमदारकी पटकावली. या ठिकाणी बोलताना त्यांनी आता आपणाला होमस्पीचवर
लढायचे आहे. पंढरपूरकरांच्या भावना आमच्याशी निगडित आहेत. माढा तालुक्यातील तीस वर्षाची सत्ता उलथवून झाली , आता पंढरपूरकरांचा श्वास मोकळा करावयाची गरज आहे. यासाठी त्यांनी आ. राजू खरे , नागेश काका भोसले आणि पंढरपूरकरांना हाक दिली.
मोहोळचे आमदार आणि पंढरपूरचे रहिवाशी राजू खरे यांनी , प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना हादरवणारे भाषण करून , आता मागे हटायचे नाही , पंढरपूर नगरपरिषदेतील सत्ता केंद्र उध्वस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे उद्गार काढले. यावेळी त्यांनी मागील २५ वर्षांपूर्वी , राजश्रीताई गंगेकर यांना नगराध्यक्ष पद मिळवून दिले होते , त्या निवडणुकीच्या आठवणी जागवल्या. तब्बल २५ वर्षांनी पुन्हा संधी चालून आली आहे. त्यावेळी आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते होतो , आता आमदार झालो आहोत , पंढरपूरकरांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही, असा विश्वास येतील नागरिकांना दिला. भैरवनाथ शुगरचे व्हॉ. चेअरमन अनिल सावंत यांनाही हाक दिली. पंढरपूर नगरपरिषद हाती आली तर , या पुढील विधानसभा निवडणूक सोपी जाईल , असाही सल्ला दिला.
अनिल नगर परिसरातील युवक नेते अक्षय गंगेकर यांनी , प्रभागाचा कारभार करताना किती अडचणी आणल्या जातात, खोटे गुन्हेही दाखल केले जातात . नवीन युवकांना राजकारणात टिकू द्यायचे नाही, असा विडाच प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी उचलला असल्याची खंत यावेळी परिचारक यांचे नाव न घेता व्यक्त केली.
भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी दोन्ही आमदारांचे कौतुक केले. यापुढील काळात आपण हातात हात घालून काम करणार असल्याची ग्वाही यावेळी पंढरपूरकरांना दिली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांनीही निवडणुकीत हातात हात घालून काम करण्याची ग्वाही दोन्ही आमदार आणि साखर कारखानदार अनिल सावंत यांना दिली.