
पंढरपूर (प्रतिनिधी)
माढा विधानसभा मतदारसंघातील नूतन उमेदवार अभिजीत पाटील यांनी, माढा नगरीत मोठा उत्साह निर्माण केला आहे. महाराष्ट्रात जे जे नवीन प्रसिद्ध होईल, ती प्रत्येक गोष्ट माढा नगरीत आणणार, अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे.
विठ्ठल प्रतिष्ठानकडून माढा नगरीत कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. याला संस्कृतीक महोत्सवाचीही जोड देण्यात आली आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील हास्यवीरांनी नागरिकांना पोट धरून हसवले. सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि इतर कलाकारांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण सोमवारी पार पडले. अस्सल मराठमोळ्या अंदाजात भार्गवीने नृत्य सादर केले. हे नृत्य रसिकांसाठी अद्वितीय ठरले. हास्यवीर अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री शिवाली परब या कलाकारांनी प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून हसवले.
यासोबतच या प्रदर्शनात शेतकरी बांधवांना नवनवीन संशोधन, आधुनिक अवजारे, पिकांच्या नवनवीन जाती, शेतीच्या आधुनिक पद्धती, याबाबत सखोल आणि शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमात नागरिकांना कृषी विषयक साहित्य पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच अशा पद्धतीचा कार्यक्रम होत असून, तालुक्यातील हजारो नागरिक याचा लाभ घेत आहेत, याचा आपणास अभिमान आहे असेही मत अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.