
पंढरपूर : माढा विधानसभा मतदारसंघ म्हटले की, आ.बबनदादा शिंदे यांचं नाव पटकन तोंडात येतं. शांत, धीरगंभीर चेहरा पटकन समोर येतो. आपल्या हक्काच्या या गादीवर आपला मुलगा रणजितसिंह
यांना बसवण्यासाठी त्यांचा जीव आतुर झाला आहे. परंतु परस्थितीनेही आता कात टाकली आहे. पाच वर्षात होऊ नये ते घडून गेलं आहे. एकीकडे पुत्रप्रेम आणि दुसरीकडे राजकीय बदलाचे वारे, यातून त्यांची घुसमट होत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.
एकेकाळचे विकासपुरुष आमदार आता पुत्रप्रेमापोटी पुरते हताश असल्याचे जाणवू लागले आहे.
राजकारणात एका पिढीनंतर दुसरी पिढी.
यात स्वतःच्या मुलास प्रथम प्राधान्य. अनेक
राजकीय नेतेमंडळींची ही अवस्था, आजवर आपणास पहावयास मिळाली आहे. यास आमदार बबनदादा अपवाद कसे राहणार. आपल्यानंतर माढा विधानसभेची जागा मुलगा रणजितसिंह यांच्याकडे देण्यासाठी, ते पुरते आतुर आहेत. या दृष्टीने त्यांनी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. प्रथम पंचायत समिती सदस्य , सभापती यानंतर जिल्हा दूध संघाचे चेअरमन अशी विविध राजकीय पदे रणजितसिंह शिंदे यांच्या गळ्यात आजवर टाकण्यात आली. यादरम्यान कोणतीही भरीव आणि नागरिकांच्या मनावर राज्य करेल, अशी कामगिरी त्यांच्याकडून झाली नाही. जिल्हा दूध संघाची पुरती पिछेहाट त्यांच्या कार्यकाळात झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुतीनंतर आ. बबनराव
शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात गेले.
( त्यांना या गटात जावे लागल्याची चर्चा मतदारसंघात होती) यानंतर मराठा आरक्षण आंदोलनात तर त्यांची मोठी पिछेहाट झाली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ठेका घेतला आहे काय ? या त्यांच्या वक्तव्याने सबंध महाराष्ट्रात धुरळा उडाला. हजारो मराठा आंदोलकांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत थेट आरोप केले. यामुळे आ. दादांचा मध्यंतरीचा काळ मोठा कठीण गेला. मतदारसंघातील अनेक गावातून त्यांना प्रखर विरोध झाला. यातच विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली.
आ. बबन दादा शिंदे यांना आता त्यांचे पुत्र
रणजीतसिंह शिंदे यांना आमदार करायचे आहे. त्या दृष्टीने मागील काही वर्षापासूनच त्यांचे प्रयत्न सुरू झाले होते. परंतु मागील काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. याचा परिणाम म्हणून आ. दादांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची तीन वेळा भेट घेतल्याची चर्चा आहे. अजित पवार आणि पर्यायाने महायुतीला सोडचिठ्ठी देण्याचे धोरण त्यांनी मागील काळातच आखले आहे. शरद पवार साहेब काय सांगतात ते पाहून, प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी शेगाव दुमाला येथील सभेत केली आहे.