महायुतीचे उमेदवार समाधान अवताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
परिचारक गटाचे शिलेदार उमेश परिचारक यांचीही उपस्थिती

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. समाधान अवताडे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत परिचारक गटाचे किंगमेकर उमेश परिचारक , पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती.
संपूर्ण जिल्ह्यात ढोल ताशे आणि शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सपाटा नेतेमंडळींकडून सुरू आहे. परंतु आ. समाधान अवताडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कोणताही गाजावाजा न करता दाखल केला.
पंढरपूर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला होता. परंतु दोनच दिवसापूर्वी आ. समाधान अवताडे यांना भाजपाने उमेदवारी बहाल केली. माजी आ. प्रशांत परिचारक यांची नाराजी दूर करण्यातही भाजपला यश आले. रविवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे पंढरपुरात आले होते. त्यांनी प्रशांत परिचारक आणि आ. समाधान अवताडे यांच्यात समेट घडवून आणला.
सोमवारी आ. समाधान अवताडे यांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन, पंढरपूर येथील प्रांत कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे पदाधिकारी, परिचारक गटाचे शिलेदार उमेश परिचारक, पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. उमेदवारी अर्ज भरून त्यांनी चालतच आपले कार्यालय गाठले. या ठिकाणी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी अवताडे यांचा जयजयकार केला.