ईतरसामाजिक

आषाढी सोहळ्यात सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार

मुंबईतील बैठकीनंतर आ. समाधान अवताडे यांची माहिती

पंढरपूर (प्रतिनिधी)

वर्षभरामध्ये पंढरपूर शहरात विविध यात्रांच्या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पांडुरंगाच्या वारी सोहळ्यामध्ये सर्वात मोठा आणि भव्य सोहळा म्हणजे आषाढी यात्रा सोहळा. हा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी सर्व भौतिक सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती,
पंढरपूर मंगळवेढ्याचे आ. समाधान आवताडे यांनी मुंबई येथे दिली.

पंढरपूरचा आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा करण्याच्या अनुषंगाने, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नियोजनाची आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस आ. समाधान अवताडे हे उपस्थित होते. या बैठकीनंतर ते पत्रकारांची बोलते झाले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, वारी परंपरेत पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांना विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशीनिमित्त जवळपास दीड हजारहून अधिक दिंड्या पंढरीमध्ये येतात. या दिंड्या समवेत आलेल्या वारकरी भाविकांना, व इतर वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनामार्फत सर्व सोयी सुविधा देण्याचे काम आघाडीवर आहे. याचबरोबर या सोहळ्यासाठी अनुदान वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी केली असता, शासन पातळीवर हे अनुदान पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी इतके झाले आहे. तसेच सर्व दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना दौंड येथे करण्याचे नियोजित असताना, पालखी विश्वस्तांनी याला कडाडून विरोध केला होता. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा कत्तलखाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

तत्पूर्वी सकाळी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली, सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याच्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली. या बैठकीय विभागीय आयुक्त पुणे हेही उपस्थित होते. सदर बैठकीसाठी आ. समाधान आवताडे हेही उपस्थित होते. भारताची दक्षिण कशी म्हणून परिचित असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखमाईच्या दर्शनासाठी वारीच्या रूपाने अनेक वारकरी भक्त पंढरपूर नगरीमध्ये येतात. परंतु येजा करत असताना या भाविकांना पंढरपूर येथील बसस्थानक जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे पंढरपूरच्या या बसस्थानकाचे विस्तारीकरण करून द्यावे, पवित्र चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वच्छतेच्या दिशेने योग्य ती कारवाई करून पंढरीतील चंद्रभागा नदीचे पावित्र्य जपले जावे, चंद्रभागा नदीमध्ये स्नान करणाऱ्या महिला वारकरी भगिनींना स्नानगृहे उभारण्यात यावीत, व पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्यात यावे, अशा विविध मागण्या आ. अवताडे यांनी या बैठकीवेळी केल्या.

या बैठकीस आ. संजय शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शासकीय विभागाचे सचिव, अप्पर सचिव, पोलीस प्रशासनातील अधिकारी, यांच्याशिवाय विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close