शेतकऱ्यांना नागवणाऱ्या खत दुकानदारांवर कारवाई करा
जनआंदोलन उभारण्याचा छावा क्रांतिवीर संघटनेचा इशारा

बोगस कंपनीचे बियाणे विकणाऱ्या तसेच, चढ्या दराने बी बियाणे आणि खते विकणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सहसंपर्कप्रमुख गणेश माने यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांना दिले असून,
राज्यातील शेतकरी चुकीच्या धोरणांमुळेच आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिवसेंदिवस बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढत चालले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर बऱ्याच कंपन्याचे बियाणे हे बोगस असल्याने उगवत नाही, बोगस रासायनिक खतामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत चालली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप याचबरोबर आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे, अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर जेव्हा कृषी कार्यालयाचे उंबरठे शेतकऱ्यांना झीजवावे लागतात, तेव्हा कार्यालयातून कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही किंवा कृषी विभाग या दुकानदारांवर किंवा कंपन्यांवर कारवाई करत नाही.
राज्यातील शेतकरी हा सतत नापिकी, निसर्गाच्या अवेळी बदलामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे. यामुळे अशा अस्मानी व सुलतानी संकटांना कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, हे महाराष्ट्र राज्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल. कृषीप्रधान म्हणून ओळख असलेल्या या राज्यात फक्त चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते, याचा विचार राज्यकर्ते म्हणून शासन कधी करणार ? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
मे महिना संपत आला असून मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे तेव्हा शेतकऱ्यांची पेरणी करण्याकरता बी बियाणे आणि खत खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. कृषी केंद्र विक्रेत्यांकडून जादा दराने बियाणे व खत विक्री सुरू आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून जादा दर घेणे, हा एक प्रकारे गुन्हाच आहे. मात्र व्यापारी वर्ग जादा दराने खत आणि बोगस बियाणे विक्री करत शेतकऱ्यांची लूट करत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांनी यात स्वतः लक्ष घालून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे सहसंपर्कप्रमुख गणेश माने यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास, मोठ्या जन आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.