पंढरपूरचा पुरवठा निरीक्षक चौकशीच्या फेऱ्यात
खा. प्रणिती शिंदे यांनी केली होती जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक, यांच्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरून, त्यांची चौकशी सुरू झाली आहे. प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली चार सदस्यीय समितीची नेमणूक झाली आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पंढरपूर तहसीलमध्ये पुरवठा विभागात असंख्य अडचणी येत असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. काही रेशन दुकानदारांनीही त्यांच्या विरोधात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती.
सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे या पंढरपूर दौऱ्यावर आल्या असता, कासेगाव येथील नागरिकांनी तालुक्याचे पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या विरोधात, तक्रारींचा पाढा वाचला.यावर प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली आहे. पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे
यांच्यासह, इतर चार जणांची समिती नियुक्त करून, त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. ही चौकशी पूर्ण करून येत्या १० जुलै पर्यंत अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामुळे पंढरपूरचा पुरवठा विभाग
चांगलाच अडचणीत आल्याचे दिसत आहे.