
पंढरपूर (प्रतिनिधी)
अंगणवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा चालू शैक्षणिक वर्षात, सकाळी नऊ नंतर भरवण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाने दिले आहेत. याची अंमलबजावी शक्यतो सर्व शाळांनी करावी, पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही शाळा व्यवस्थापनाने शाळा सकाळी नऊ वाजण्यापूर्वी भरवू नयेत, असे सुचित करण्यात आले आहे. यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा झोपमोडीचा मुद्दा निकाली निघणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांच्या व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे.रात्री उशिरापर्यंत होणारे ध्वनी प्रदूषण, तसेच मनोरंजनाची साधने, यामुळे
लहान विद्यार्थी रात्री उशिरा झोपतात. सकाळी शाळेला जाण्यापूर्वी त्यांना दोन तास अगोदर उठावे लागते, साहजिकच या विद्यार्थ्यांची झोप व्यवस्थित होत नाही. परिणामी हे विद्यार्थी दिवसभर आळसावलेले दिसतात. साहजिकच या परिस्थितीचा त्यांच्या आरोग्य आणि शिक्षण घेण्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. ही परिस्थिती राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. शिक्षण विभागाने यावर उचित कार्यवाही करण्याचे ठरवले आहे.
राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांनी अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा, सकाळी नऊ वाजेनंतर भरवाव्यात अशा सूचना सर्व व्यवस्थापनांना दिल्या आहेत. ज्या शाळा व्यवस्थापनांना ही वेळ पाळण्यात काही अडचण येत असल्यास, त्यांनी शिक्षण विभागास याबाबत कळवणे बंधनकारक आहे. कोणत्याही शाळा व्यवस्थापनाने पूर्व परवानगी शिवाय शाळा नऊ वाजवण्यापूर्वी भरवू नयेत, असे आदेश सर्व शाळा व्यवस्थापनांना दिले गेली आहेत. यामुळे चालू शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर भरणार आहेत.