आमदारकी मिळवायचीय ! एकाला परिचारकांच्या जीवावर … तर दुसऱ्याला वडिलांच्या जीवावर ..
अपक्ष खासदारांना कसे कळणार ? अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण ? - अनिल सावंत

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांचा पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये गाव भेट दौरा आयोजित केला होता. यामध्ये सिद्धेवाडी, तावशी, तनाळी, तपकिरी-शेटफळ, खर्डी गावांचा समावेश होता.
सिद्धेवाडी गावामध्ये दिलेल्या भेटीत उपस्थित मतदारांशी बोलताना अनिल सावंत यांनी सांगलीचे खा. विशाल पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.
काल मरवडे याठिकाणी विशाल पाटील यांची सभा झाली होती. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ काल विशाल पाटील यांनी बोलताना, नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका केली होती.
विशाल पाटलांच्या टीकेला उत्तर देताना आज अनिल सावंत यांनी सिद्धापुर गावामध्ये बोलताना त्यांचा चांगलाच समाचार घेतला. अनिल सावंत म्हणाले, काल आपल्या एका मित्र पक्षाच्या उमेदवाराची सभा झाली. या सभेत एक अपक्ष खासदार म्हणाले, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार भगीरथ भालके हेच आहेत. मला एक गोष्ट कळत नाही. मुळात हा अपक्ष खासदार, आणि यांना महाविकास आघडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकारी कोणी दिला ? आमचं आम्ही बघून घेऊ ना.
अनिल सावंत यांनी विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि भगीरथ भालके यांच्यावरही खडसून टीका केली. एक परीचारकांच्या जीवावर आमदार झालेत, अन् दुसरे वडिलांच्या पुण्याईवर आमदार होण्याचे स्वप्न पाहतायत.
वडिलांच्या जीवावर राजकारणात यशस्वी होण्याचे दिवस आता गेले आहेत. विद्यमान आमदार सांगतात, तीन हजार कोटींची कामे केली. मात्र पंढरपूर मंगळवेढ्यातील अनेक गावात पायाभूत सुविधांची देखील सोय नसल्याचं वास्तव आहे. मग नक्की तीन हजार कोटी गेले कुठे? कॉन्ट्रॅक्टर यांचीच लोकं असल्यावर, तीन हजार कोटी फक्त कागदावरच दिसणार. अशी जहरी टीका महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी नाव न घेता समाधान आवताडेंवर केली. यावेळी वसंतनाना देशमुख, जिल्हाध्यक्ष ओबीसी सौ. शारदाताई जाधव, सिद्धापूर गावाचे सरपंच सारंग जाधव, ग्रा.प सदस्य, बाबुराव गोडसे, मा. आप्पा जाधव, सचिन जाधव, विशाल जाधव, विजय जाधव, सुनील जाधव, आदी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मतदारांशी बोलताना अनिल सावंत म्हणाले, आतापर्यंत केवळ पाणी आणि रस्त्याच्या प्रश्नावरच निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. आणखी किती दिवस आपण याच मुद्द्यांवर निवडणुका लढणार आहोत. मला एक संधी द्या, पाणी आणि अंतर्गत रस्त्यांवर पुन्हा निवडणूक लढवण्याची वेळ येऊ देणार नाही.