राजकिय

बंडखोरी .. पक्षाला सोडचिठ्ठी … पंढरपुरात काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय ?

चुकतंय कोण ? खासदार की उमेदवार

पंढरपूर (प्रतिनिधी)

काँग्रेस पक्षाने पंढरपूर मतदारसंघात घाई घाईने उमेदवार दिला. या मतदारसंघाची धुरा भगीरथ भालके यांच्या खांद्यावर दिली. खा. प्रणिती शिंदे यांनी या उमेदवाराच्या विजयासाठी आपण रात्रीचा दिवस करणार असल्याचे सांगितले. परंतु या मतदारसंघात काँग्रेस पक्षातच दुफळी निर्माण झाली. एकापाठोपाठ एक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देण्याचे ठरवले. आणि राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यात सहभागीही झाले.आता यात चूक कोणाची ? उमेदवार भगीरथ भालके यांची, की खासदार प्रणिती शिंदे यांची ? चूक कोणाचीही असो. पंढरपूर तालुक्यात काँग्रेसची पुरती नाचक्की झाली.

पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीला सुरुवात झाली ती, लोकसभा निवडणुकी वेळीच. लोकसभेच्या उमेदवार खा. प्रणिती शिंदे यांच्यावर नाराज होत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी त्यावेळी, अभिजीत पाटील गटाला पाठिंबा जाहीर केला होता. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत, खा. शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे या विजयी झाल्या. यानंतर खा. प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या वाढीसाठी कार्यतत्पर झाल्या. ही तत्परता एवढी मोठी आहे की ,त्यांनी पंढरपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असतानाही, भगीरथ भालके यांच्या मागणीवरून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून, त्यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली. यानंतर शरद पवार यांनी या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित केला,  आणि महाविकास आघाडीत गोंधळ उडाला.

परंतु महाविकास आघाडीत गोंधळ घालूनही
काँग्रेस पक्षात सारे काही आलबेल नाही, हेच पुढील घडामोडीवरून दिसून आले. काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच, भगीरथ भालके यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी खा. प्रणिती शिंदे याही त्यांच्यासोबत होत्या. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेतेमंडळींना दम भरण्याचे धाडस केले. राष्ट्रवादीचा उमेदवारही निवडणूक रिंगणात असल्यामुळे, आपली उमेदवारी महाविकास आघाडीची उमेदवारी म्हणून घोषित करा, नाहीतर याचे परिणाम माढा आणि मोहोळ मतदार संघात दाखवून देऊ, असा सज्जड दम त्यांनी दिला. हा दम दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नसून , राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार आणि प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी होता. याबाबत सभास्थळी चांगलीच चर्चा रंगली होती.मागील तीन दिवसापूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी इतर पाच पदाधिकाऱ्यांसह, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दर्शवला. काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि खा. प्रणिती शिंदे या दोघांवरही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत आसूड ओढला आहे.

खा. प्रणिती शिंदे यांच्यावर गरळ ओकत, पंढरपूर शहरातील अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष अशपाक सय्यद यांनी याच विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली आहे. यावरून येथील पदाधिकाऱ्यांमध्ये खा. प्रणिती शिंदे यांच्याबाबत नाराजी असल्याचे दिसून येते. खासदार आणि उमेदवार या दोघां विरोधातील नाराजीचा फटका मतदारसंघात काँग्रेसला नक्कीच बसणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close