तेवीस तारखेला त्यांना परत गुवाहाटीला पाठवा
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सांगोल्यातील मतदारांना आवाहन

पंढरपूर (प्रतिनिधी)
मागील विधानसभा निवडणुकीतच दीपक आबा शिवसेनेचे उमेदवार बनणार होते , परंतु अचानक खोकेवाल्याचे नाव पुढे आले. दीपक आबांनी मोठ्या मनाने निवडून आणायची हमी घेतली, निवडून आणलेही. शिवसेनेने त्यांना काहीही कमी केले नव्हते. तरीही त्यांना दुर्बुद्धी सुचली, आणि खोके घेऊन त्यांनी गुवाहाटी गाठली. त्यांना माहीतच नव्हतं, आपण गद्दार झालो तरीही, येथील जनता गद्दार होणार नाही. आता येत्या २३ तारखेला त्यांना पुन्हा गुवाहाटीच तिकीट काढून द्या. जाऊद्या डोंगर, झाडी आणि हॉटेल बघायला, असे उद्गार शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगोला येथील जाहीर सभेत काढले. शिवसेनेचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन येथील जनसमुदायास केले.
सांगोला येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील ,यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, प्रफुल्लचंद्र झपके यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेस सांगोला तालुक्यातून सुमारे ५० हजारांचा जनसमुदाय लोटला होता.
या सभेस संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी आ. शहाजीबापू पाटील यांचा ठाकरे शैलीत खरपूस समाचार घेतला. मोदी आणि शहांवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील विधानसभा निवडणुकीच शिवसेनेचे उमेदवार म्हणून दीपक आबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार होती. परंतु येथील काही लोकांनी शहाजीबापू पाटील यांचे नाव पुढे केले. आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांना मी थांबण्याची विनंती केली. दीपक आबांनी ही विनंती स्वीकारून त्याचे कर्तव्यही पार पाडले. शहाजीबापू पाटील यांना निवडूनही आणले. शिवसेना पक्षाने त्यांना काहीही कमी केले नव्हते. तरीही त्यांना विपरीत बुध्दी सुचली. त्यांनी गुवाहाटी गाठली. मोठ्या खोक्यांचा व्यवहार झाला. परंतु त्यांना माहीतच नव्हते, महाराष्ट्रात गद्दारांना क्षमा नसते. स्वतः गद्दार झाले म्हणून येथील जनता गद्दार होणार नाही. आता हीच जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. येत्या २३ तारखेला त्यांचे गुवाहाटीचे तिकीट काढून ठेवा, जाऊ द्या त्यांना फिरायला, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
देशात चाललेल्या मोदींच्या राजकारणावर त्यांनी कडाडून टीका केली. येथून ४०० किलोमीटर अंतरावर असलेली मुंबई मोदी आणि शहा अदानींच्या घशात घालू पाहत आहेत. हे असेच चालत राहिले तर , प्रत्येकाच्या सातबारा उताऱ्यावरही अदानीचे नाव आल्याशिवाय राहणार नाही. धर्माच्या नावावर जातीय दंगली घडवून , हा महाराष्ट्र यांना मित्रा मित्रात वाटून घ्यावयाचा आहे, ज्यावेळी महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल , त्यावेळी पुन्हा ही मुंबई त्यांच्या घशातून काढून, सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे मी स्वतः देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सांगितले की , गेली ३० वर्षे मी राजकारण केले आहे. शेकापच्या उमेदवाराला अनेकदा तर सध्याच्या आमदाराला एकदा निवडून आणले आहे. परंतु आता यातील एकजणही थांबायला तयार नाही. उमेदवारी अर्ज भरताना येथील मतदारांनी दाखवलेले प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. आता सर्वांनी मशाल चिन्हासमोरील मटण दाबून विजयाचा मार्ग सुकर करावा, असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले.