
पंढरपूर (प्रतिनिधी)
ज्याप्रमाणे उत्तराखंड राज्याला देवभूमी समजले जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्राची ओळख संतभूमी म्हणून व्हावी, अशी आपली इच्छा आहे. यासाठी संसदेत आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित खा. प्रणिती शिंदे यांनी दिली. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमी आहे. या भूमीत अनेक संत होऊन गेले. समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. या संतपरंपरेमुळेच पंढरीला विशेष स्थान आहे. यामुळेच महाराष्ट्राला संतभूमी म्हणून ओळखण्यात यावे, यासाठी आपण संसदेत आवाज उठवणार असल्याची भूमिका खा. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.
सोलापूर लोकसभेच्या निवडणूकीत प्रणिती शिंदे या निवडून आल्या आहेत. त्यांच्या विजयात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे. यासाठी येथील मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या पंढरपूर मध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी राजे शिंदे आणि व्यवस्थापनाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
पंढरपूर शहरातील दाते मंगल कार्यालयात हा कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, चेतन नरोटे, राष्ट्रवादीच्या व्यापार आणि उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, भगीरथ भालके यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.