
पंढरपूर (प्रतिनिधी)
मोहोळ विधानसभा निवडणूक एकतर्फी होते की काय, अशी परिस्थिती असताना, उद्योजक राजू खरे यांच्या रूपाने विरोधकांना सेनापती मिळाला. राष्ट्रवादीप्रमुख शरद पवार यांनी त्यांना सरसेनापती पद बहाल केले. आणि उमेदवारी अर्ज भरायच्या अखेरच्या क्षणी, ही निवडणूक चुरशीची बनली. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसकडून मंगळवारी राजू खरे उमेदवारी अर्ज दाखल केला.
मोहोळ तालुक्यातील प्रस्थापितांना विरोध करणारे परंपरागत विरोधक उमेश पाटील, नागनाथ क्षीरसागर, संजय क्षीरसागर, सीमाताई पाटील, विजयराज डोंगरे, काका देशमुख यांच्यासह इतर काही विरोधक मोठे बेचैन होते.प्रस्थापित आ. यशवंत माने यांना टक्कर देऊ शकणारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता. ही बेचैनी अखेर राजू खरे यांच्या रूपाने बारामतीमधील गोविंद बागेत पोहोचली. विरोधकांची एकजूट आणि उमेदवार पाहून शरद पवार यांनी निर्णय घेतला. याअगोदर जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेत,राजू खरे यांच्या हाती तुतारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजू खरे हे गेल्या पाच वर्षापासून मोहोळ मतदार संघात राब राब राबत आहेत. तुतारी हाती लागल्याने त्यांनीही धडाका उठवला. बुधवारी सकाळी चार चाकी गाड्यांचा ताफा गोपाळपूरहून मोहोळकडे रवाना झाला ,आणि प्रस्थापितांना टक्कर देणारी उमेदवारी या मतदारसंघास मिळाली.
बुधवारी अखेरच्या क्षणी राजू खरे यांनी आपली उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसकडून दाखल केली. याप्रसंगी मनोहर भाऊ डोंगरे, बळीराम काका साठे, उमेश पाटील, मनोहर सपाटे, दीपक गायकवाड,पद्माकर देशमुख, मानाजी माने, विजयराज डोंगरे, काका देशमुख, सीमाताई पाटील, महेश देशमुख, शिवराज गायकवाड, तृप्ती खरे, विक्रम देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.