
पंढरपूर (प्रतिनिधी)
कित्येक तालुक्यात तालुक्याची आमसभा घेण्यासाठी , नागरिकांना आंदोलन करावे लागते. ही आमसभाही तीन चार तासात गुंडाळली जाते. परंतु तब्बल आठ तास तालुक्याची आढावा बैठक चालली. अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. हे चित्र माढा तालुक्याचे आहे.माढा तालुक्याचे नवनिर्वाचित आ. अभिजीत पाटील यांनी
दमदार आढावा बैठक घेऊन ,अधिकाऱ्यांनाही सकारात्मक राहण्याचे आदेश दिले. याच बैठकीतून तालुक्यातील अधिकाऱ्यांना आ. अभिजीत पाटील यांच्या दमदार कामाची ओळख पटली.
सोमवार दि. सहा जानेवारी रोजी
कुर्डूवाडी येथील पंचायत समितीमध्ये आ. अभिजीत पाटील यांनी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. हिवाळी अधिवेशनात ५५ प्रश्न मांडून उच्चांक केलेल्या अभिजीत पाटील यांच्यासोबतच्या या बैठकीत
अधिकारीही पुरते एकाग्र झालेले दिसले. या बैठकीत आ. पाटील यांनी रस्ते, विज, तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित केले.
यावेळी माजी जि. प. सदस्य भारत आबा शिंदे, माढ्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, एसटी डेपो मॅनेजर आणि इतर सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माढा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे, मतदारसंघासाठी २२० के .व्ही. सबस्टेशन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे याबाबत चर्चा करण्यात आली. शासनाच्या विविध योजनेत वंचित घटकांना सामावून घेत , नागरिकांना योग्य त्या योजनेचा लाभ देण्यात यावा असे आदेशही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. कृषी विभागातील योजनांचा आढावाही घेण्यात आला.
अनेक वर्षापासून मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याबाबत ग्रामीण मार्ग आराखडा तयार करून तो लवकरात लवकर मंजुरीसाठी देण्यात यावा, असे आदेशही देण्यात आले. विविध ठिकाणी अंगणवाडी उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी नवीन अंगणवाडीच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सीना माढा प्रकल्पातून येणारे पाणी हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. निवडणुकीदरम्यान मतदारसंघातील नागरिकांना दिलेल्या शब्द पाळण्यासाठी आ.
अभिजीत पाटील हे रात्रीचा दिवस करत आहेत , याची खात्री, या आठ तास चाललेल्या बैठकीवरून अधिकाऱ्यांसह नागरिकांनाही पटली आहे.