
पंढरपूर (प्रतिनिधी)
मोहोळ विधानसभा मतदारसंघात १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता दहा उमेदवार निवडणूक रिंगणात असून, मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महायुतीचे उमेदवार यशवंत माने, महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे आणि अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर या तिघांमध्ये अटीतटीचा सामना पाहावयास मिळणार आहे.
महाविकास आघाडीतील उमेदवार निवडीस उशीर झाला होता. प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. या उमेदवारीला मोहोळ बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठा विरोध झाला. या समितीतील सदस्यांनी शरद पवार यांची बारामती येथील गोविंद बाग येथे जाऊन भेट घेतली. अखेर शरद पवार यांनी ही उमेदवारी मागे घेत, राजू खरे यांना घोषित केली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागनाथ क्षीरसागर, रमेश कदम ,सिद्धी रमेश कदम यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. संजय क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मोहोळ तालुका बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच उमेदवार राजू खरे यांनी मोठे प्रयत्न केले. परंतु त्यास यश आले नाही. अखेर संजय क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज कायम झाला, आणि मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली.
संजय क्षीरसागर यांनी आजपर्यंत विधानसभा , लोकसभा तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या आहेत. त्यांच्या बाजूने मोहोळ तालुक्यात निर्णायक मतदान आहे. त्यांच्यामागे मोहोळ तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने एकवटला जाईल, अशी अपेक्षा आहे. मोहोळ अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा, आ. यशवंत माने आणि राजन पाटील यांना अडचणीचा ठरत असल्याचे दिसत असतानाच , संजय क्षीरसागर यांची अपक्ष उमेदवारी , कोणाला फटका देणार , हे पुढील काळातच समजणार आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघात यशवंत माने (राष्ट्रवादी अजित पवार), राजू ज्ञानू खरे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), नागनाथ देविदास क्षीरसागर (रासप), नंदू बाबुराव शिरसागर (ब्ल्यू इंडिया पार्टी), याशिवाय अमोल अभिमन्यू बंगाळे, अनिल नरसिंह आखाडे, कृष्णा नागनाथ भिसे, सुरेश मधुकर थोरात, संजय दत्तात्रय क्षीरसागर इत्यादी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. असे असले तरीही, हा सामना तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.