
पंढरपूर (प्रतिनिधी)
दुग्ध व्यवसायातील समस्यांबाबत आ. समाधान अवताडे कायमच पाठपुरावा करत आहेत. बुधवारी त्यांनी मंगळवेढयामध्ये दूध उत्पादक शेतकरी आणि संस्था चालकांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत दूध उत्पादक शेतकरी आणि संस्था चालकांनी, त्यांच्या समस्यांचा पाढा आ. अवताडे यांच्यासमोर वाचला. या समस्या घेऊन आ.अवताडे यांनी थेट मंत्रिमंडळ गाठले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा केली. येत्या शनिवारी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी याविषयी बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्रिमंडळाच्या या बैठकीत दूध दरासंदर्भात काय निर्णय होणार ? याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांच्या समस्या आ. अवताडे यांनी जाणून घेतल्या. या समस्यांचा अभ्यास करून मंत्रिमंडळासमोर मांडावयाच्या मागण्यांची यादी बनविली. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.