राजकियसामाजिक

दूध दराबाबत शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक

आ. समाधान अवताडे यांचा जोरदार पाठपुरावा

पंढरपूर (प्रतिनिधी)

दुग्ध व्यवसायातील समस्यांबाबत आ. समाधान अवताडे कायमच पाठपुरावा करत आहेत. बुधवारी त्यांनी मंगळवेढयामध्ये दूध उत्पादक शेतकरी आणि संस्था चालकांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत दूध उत्पादक शेतकरी आणि संस्था चालकांनी, त्यांच्या समस्यांचा पाढा आ. अवताडे यांच्यासमोर वाचला. या समस्या घेऊन आ.अवताडे यांनी थेट मंत्रिमंडळ गाठले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा केली. येत्या शनिवारी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी याविषयी बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मंत्रिमंडळाच्या या बैठकीत दूध दरासंदर्भात काय निर्णय होणार ? याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांच्या समस्या आ. अवताडे यांनी जाणून घेतल्या. या समस्यांचा अभ्यास करून मंत्रिमंडळासमोर मांडावयाच्या मागण्यांची यादी बनविली. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दूध दरवाढ आणि दूध दर कपातीवर शासनाचे नियंत्रण हवे, उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्यात यावे, शासनाने दरवर्षी दुधाच्या उत्पादन खर्चावर आधारित एमएसपी आणि एफआरपी ठरवावी, शासकीय दूध योजना पुनर्जीवित करण्याकरता विशेष प्रयत्न करावेत, म्हशीच्या दुधाचा प्रतिलिटर खर्च ६० रुपये, तर गाईच्या दुधाचा खर्च प्रति लिटर ३५ रुपये इतका आहे, म्हणून गाईच्या दुधाचे ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये दर जाहीर करण्यात यावा, जनावरांच्या गोठा निर्मितीसाठी ६०:४० चे धोरण बदलून ते ९५:०५ करण्यात यावे, जनावरांचा विमा थेट शासनाने उतरवावा, या मागण्या आ. अवताडे यांनी
निवेदनाद्वारे मंत्रीमंडळापुढे केल्या आहेत. यावर थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे, शनिवारी सायंकाळी ५ वाजता याबाबत मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close