
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यात विधानपरिषद निवडणूक होऊ घातली असून यापैकी ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
विधानसभा सदस्यांमधून निवडावयाच्या दहा जागा तर इतर एका जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपाकडून पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर या पाच उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले गेले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गरजे आणि राजेश विटेकर हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, शेकापचे जयंत पाटील हेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन आहे. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना निवडणूक रिंगणात उतरवले गेले आहे.