
पंढरपूर (प्रतिनिधी)
कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या विठुरायाच्या आषाढी वारीस, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हजेरी लावावी, यासाठी खा. प्रणिती शिंदे आणि खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्लीत जाऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार हेही उपस्थित होते.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी हे पायी वारी करणार असल्याच्या बातम्या, काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाल्या होत्या. जुलै महिन्यातील १२ ते १४ यादरम्यान ते वारी सोहळ्यात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीस आता पुन्हा दुजोरा मिळाला आहे.
सोलापूरच्या खा. प्रणिती शिंदे आणि माढ्याचे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी पंढरपूरच्या वारीचे महत्त्व राहुल गांधींना पटवून दिले आहे. यावर दोन्ही खासदारांनी राहुल गांधी यांनी पंढरपूरच्या वारीत सहभाग नोंदवावा, अशी विनंती केली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंढरपूरच्या वारी सोहळ्यासाठी नक्कीच दाखल होतील, असा राजकीय अंदाज बांधला जात आहे.
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी या आधीही भारत जोडो यात्रेत हजारो मैलांचा प्रवास केला होता.
यामुळे पालखी सोहळ्यात ते सहभागी होतील, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्व विरोधी वक्तव्य केल्याचे दाखवत गालबोट लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून होत आहे. लोकसभेत त्यांनी हिंदुत्व विरोधी वक्तव्य केले असल्याचा ठपका त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवला आहे. परंतु याबाबतचे थेट प्रक्षेपण नागरिकांनी पाहिले आहे. यामुळेच भाजपची ही रणनीती साफ अपयशी ठरणार आहे.
खा. राहुल गांधी यांनी जर पायी वारी करण्याचे ठरवले, तर त्यांच्याबरोबर अनेक नेतेमंडळींचा सहभाग राहणार आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होणार आहे.