जिल्हा मध्यवर्ती बँकेने बलुतेदारांना संयुक्त कर्ज वाटप करावे
प्रशासक कुंदन भोळे यांच्याकडे पंढरपूर गटपातळी बहुउद्देशीय संस्थेची मागणी

पंढरपूर (प्रतिनिधी)
समाजातील कारागीर संस्था आणि बारा बलुतेदार यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संयुक्त कर्ज देण्याची सोय आहे. प्रत्येक कारागिराला या प्रकारचे संयुक्त कर्ज
देता येते. ही संयुक्त कर्ज प्रकरणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरू करावीत , याकामी गटपातळी बहुउद्देशीय संस्था मध्यस्ताची भूमिका बजावेल, अशी मागणी
पंढरपूर गटपातळी बहुउद्देशीय संस्थेकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांकडे करण्यात आली.
याबाबतचे निवेदन नुकतेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांना देण्यात आले असून, याप्रसंगी पंढरपूर गटपातळी बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन सत्यवान देवकुळे, व्हा. चेअरमन राजेंद्र मस्के तसेच संचालक अशोक पाटोळे हेही उपस्थित होते. कारागीर संस्था आणि बारा बलुतेदारांच्या आर्थिक उन्नतीसाठी या संस्थेकडून करण्यात आलेली मागणी अगदी रास्त असल्याच्या प्रतिक्रिया, समाजातून उमटू लागल्या आहेत.