राजकिय

बेदखल मोहिते पाटील !

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पुनर्वसन रखडले ....

पंढरपूर (प्रतिनिधी)

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीप्रमुख शरद पवार यांनी एका राजकीय घराण्यास जीवदान दिले. मोहिते पाटील कुटुंबाचे पुनर्वसन केले. धैर्यशील मोहिते पाटील खा. म्हणून उदयास आले. आता पुन्हा जिल्ह्यावर मोहिते पाटील घराणे राज्य करणार, असा कयास अनेक मंडळींनी त्याचवेळी बोलून दाखवला. याची चुणूक चालू विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत होता. परंतु यातील एकही गोष्ट झाली नाही. याउलट आ. रणजितसिंह मोहिते हा दोन्ही घरचा पाहुणा आजही उपाशीच असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील
यांचा सन २००९ पूर्वीचा राजकीय काळ आठवला तर , मोहिते पाटलांच्या सुवर्ण काळाची आठवण होते. स्वतःच्या घरात दोन दोन मंत्रीपदे, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र गट, जिल्हा परिषदेवर एकहाती वर्चस्व, लेबर फेडरेशनही त्यांच्याच वर्चस्वाखाली असल्याचे चित्र नजरेसमोर येते.

सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर, या राजकीय घराण्यास घरघर लागली. विजयसिंह मोहिते पाटील हे पंढरपूर मतदारसंघातून पराभूत झाले. यानंतर मोहिते पाटलांनी खासदारकी मिळवली खरी, पण त्यांचे मन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रमलेच नाही. सन २०१९ साली आ. मोहिते पाटील कुटुंबाने भाजपाचा रस्ता धरला. मोहिते पाटील कुटुंबाच्या आधाराने भाजपाने जिल्ह्यावर वर्चस्व मिळवले. या पक्षातही मोहिते पाटील कुटुंबास कुजवत ठेवण्यात आले. परिणामी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी या कुटुंबास पुन्हा राजकीय आसरा दिला, धैर्यशील मोहिते पाटील खासदारपदी विराजमान झाले.

या निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले. आ. रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देऊन, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशा राजकीय वावड्या उठू लागल्या. मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याअगोदरच विधानसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीत मोहिते पाटील राजकीय करिष्मा दाखवतील , असा अंदाज राजकीय पटलावर मांडण्यात येऊ लागला. परंतु आता उमेदवारीचे वाटपही पूर्ण झाले. सोलापूर जिल्ह्यात करमाळ्याचे नारायण पाटील वगळता, कोणत्याही मोहिते पाटील समर्थकास उमेदवारी देण्यात आली नाही. याचवेळी आ. रणजीतसिंह मोहिते पाटील हे स्वतः माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची अनेकदा भेटही घेतली होती. परंतु त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. राष्ट्रवादीप्रमुख शरद पवार यांनी ही निवडणूक एकहाती हाताळण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे दिसून आले.

माढा मतदारसंघाचे गणित चुकल्यावर, आता आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे काय होणार ? ते भाजपाच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार की नाही ? या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, मोहिते पाटील कुटुंब जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व निर्माण करेल ,असा जो अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात होता, त्यास सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. वरचेवर
राजकारणाचे स्वरूपही बदलत आहे. राजकारणात फोडाफोडीचे राजकारण होत असल्यामुळे , कोणत्याही एका नेत्याच्या वर्चस्वाखाली एखादा जिल्हा असणे , सध्या तरी कोणत्याही राजकीय पक्षास परवडणारे नाही.

यामुळे आता फक्त आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, शरद पवार यांच्यापुढे असल्याचे दिसून येत आहे. सध्या तरी ते महाविकास आघाडीच्या सहवासात तर महायुतीपासून दूर आहेत. उघडपणे ते कोणाचेही समर्थन करू शकत नाहीत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close