यशकिर्ती विद्यालयात गुलाबपुष्प देऊन आणि पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत
शाळेतील उपक्रमाचे पालकांकडून कौतुक

पंढरपूर (प्रतिनिधी)
श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या, पंढरपूर येथील यशकिर्ती माध्यमिक विद्यालयात शनिवार दि. १५ जून २०२४ रोजी, सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांवर, मोठ्या उत्साहाने पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रशालेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ. ज्योती बागल मॅडम यांनी औक्षण करून स्वागत केले.
यावेळी विद्येची देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जयंत मोडक सर, सचिव डॉ. एम. आर. टकले, संस्थेचे उपाध्यक्ष सलीमहुसेन बोहरी, यांनी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका ज्योती बागल मॅडम, इयत्ता पाचवीचे वर्गशिक्षक अजीम मुजावर यांनी विद्यार्थ्याचे स्वागत केले.
पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थी अतिशय आनंदी दिसत होते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने प्रशालेमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले होते. खरच विद्यार्थ्यांशिवाय शाळाच होऊ शकत नाही. या प्रसंगी प्राथमिक विभागाच्या छोट्या चिमुकल्यांचेही सर्व शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. तसेच प्रशालेतर्फे त्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या हस्ते प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची जबाबदारी प्रशालेतील सर्वच शिक्षकांनी घेतली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.