पंढरपुर मंगळवेढ्यातील जनतेला अजूनही विकास हवाय
एमआयडीसी मंजुरीनंतर आ. अवताडे यांची बोलकी प्रतिक्रिया

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कासेगाव येथे पंढरपूर एमआयडीसीला मंजुरी देण्यात आली. येथील काही क्षेत्रास औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. याचा पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील जनतेने उत्सव साजरा केला. यानंतर बोलताना आ. अवताडे यांनी येथील नागरिकांवर विश्वास व्यक्त केला. आजपर्यंत दोन हजार कोटींची कामे झाली आहेत. पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. येथील जनतेला अजूनही विकास हवा आहे, यामुळेच येथील जनता नक्कीच आपल्या पाठीशी उभी राहील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ते शुक्रवारी पंढरपूर
येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला होता. आपणास तीन वर्षाचा अल्प कालावधी मिळाला. या कालावधीत मंगळवेढ्यातील २४ गावांचा पाणी प्रश्न निकाली काढला. याचवेळी मतदारसंघातील वाड्या वस्त्या तसेच खेडोपाड्यातील रस्त्यांसाठी २ हजार कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणला. अद्यापही या मतदारसंघात विकास कामांचा मोठा अनुशेष आहे. येथील जनतेला अजूनही विकास हवा आहे, यामुळे येथील जनता यापुढील काळातही आपल्या पाठीशी राहील, असा भक्कम विश्वास आ. अवताडे यांनी यावेळी व्यक्त केला.
पंढरपूर एमआयडीसीच्या निर्मितीबाबत गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. आ. अवताडे यांनी
एमआयडीसी स्थापनेवर शिक्कामोर्तब केले. याबाबतही उलट सुलट चर्चा मतदारसंघात होत आहेत. लवकरच या एमआयडीसीचे भूमिपूजनही होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
एमआयडीसी उभारणीनंतर येथील बेरोजगार युवक तसेच शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मंगळवेढा एमआयडीसी सारखी पंढरपूर एमआयडीसीची अवस्था नक्कीच होणार नाही, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
*पंढरपूर एमआयडीसीच्या मंजुरीनंतर पंढरी नगरीत जल्लोष*
पंढरपूर एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळाल्याचे पत्र आ. समाधान अवताडे यांनी २२ ऑगस्ट रोजी आणले. या एमआयडीसीच्या स्थापनेमुळे आ. अवताडे समर्थकांनी पंढरीत एकच जल्लोष केला. चार यात्रांवर उपजीविका करणारे पंढरपूर, अशी पंढरपूर नगरीची ओळख आहे. ही ओळख एमआयडीसीमुळे नक्कीच पुसली जाणार आहे, असा विश्वास आ. अवताडे यांनी व्यक्त केला