
पंढरपूर तालुक्यातील कुर्डूवाडी रोडवरील दोडला दूध डेअरीकडून तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, प्रत्येक शेतकऱ्याचे प्रती लिटर आठ रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांची लूट सुरू असून, याप्रकरणी येथील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी परिसरातील
सुमारे ५०० शेतकऱ्यांनी, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, सरपंच संजय साठे, शिवसेना तालुकाध्यक्ष शिवाजी बाबर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी येथील दोडला डेअरीमध्ये जाऊन आक्रमक रूप दाखवले. राज्य सरकारने जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले. अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी दूध संघाने १० जानेवारी २०२४ पर्यंत अपलोड करावयाची होती. परंतु या दूध संघाकडून ही यादी ११ जानेवारी रोजी सबमिट करण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. याचवेळी अनुदान जाहीर होताच, या दूध संघाकडून दुधाचा दर ३० रुपयांवरून २७ रुपये करण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून याच दराने दूध घेतले जात आहे. अनुदानही नाही, आणि दूध दरही कमी यामुळे, या शेतकऱ्यांची लूट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शनिवारी सकाळी हे शेतकरी या दूध संघासमोर
जमले. या ठिकाणी व्यवस्थापकाबरोबर शेतकऱ्यांची बाचाबाची झाली. यानंतर एक दिवसाची मुदत या व्यवस्थापनाने जमावास मागून घेतली. दोडला हा खाजगी दूध संघ आंध्र प्रदेशमधील असून, दूध संकलन क्षेत्रात याचे मोठे नाव आहे. गेल्या चार महिन्यापासून शेतकऱ्यांचे प्रती लिटर ८ रुपयाचे नुकसान या दूध संघाकडून झाले आहे. दूध संघाच्या व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. या धमकीवरून त्यांची भांडवलशाही वृत्ती दिसून आली आहे.
दूध भेसळीचाही आरोप
दरम्यान सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख साठे यांनी दूध संघात भेसळ होत असल्याचा आरोप केला आहे. दूध संकलन कमी असताना दररोज २५ हजार लिटर दूध हैदराबादला पाठवले जाते. याची चौकशी प्रशासनाने करावी अशी मागणी केली आहे.