आषाढी महापूजेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण
सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

पंढरपूर (प्रतिनिधी)
आषाढी यात्रा दरवर्षी आषाढी शुध्द एकादशी या दिवशी भरते. यावर्षीची आषाढी यात्रा बुधवार, दि. १७ जुलै रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता, मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्रीं विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मंदिर समितीकडून हे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला.