
पंढरपूर (प्रतिनिधी)
नाशिकमध्ये हिंदू युवा वाहिनी या संघटनेने अधिकृत पत्र काढून, जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. स्पृश्य अस्पृश्य भेद करणाऱ्या या मनुवादी संघटनेवर तात्काळ बंदी घालावी, अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. हिंदू युवा वाहिनी या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या या पत्रावरून, राज्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक मधील काळाराम मंदिर हे हिंदूंचे मंदिर आहे. या मंदिराजवळ कोणीही निळा पिवळा झेंडा लावू नये, तसे केल्यास पुन्हा पाठीवर झाडू आणि गळ्यात मडके
देण्यात येईल, हे हिंदुराष्ट्र आहे, आणि काळाराम मंदिर हे हिंदूंचे मंदिर आहे. या मंदिराजवळ जे भिमटे स्तंभ उभारण्यात आले आहेत, ते तात्काळ काढून टाकण्यात यावेत. असा मुजोर सल्ला, हिंदू युवा वहिनीने पत्र काढून प्रसिद्ध केला होता. याचवेळी मंदिराजवळील हिंदूंनी शूद्र जातींना आपल्या घरी बोलवूं नये, त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये, याशिवाय त्यांचा स्पर्शही होऊ देऊ नये, असा सल्ला हिंदूंना दिला होता. यावरून नाशिक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भारत देश हा सार्वभौम देश आहे. देशात अनेक जाती गुण्यागोविंदाने नांदत आहेत. देशाच्या संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू युवा वाहिनी या संघटनेने काढलेले पत्र निश्चितच धोकादायक आहे. यामुळे जाती जातीत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.समाजात अशांतता पसरण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा मनुवाद अस्तित्वात आणू पाहणाऱ्या, या संघटनेच्या पत्रावरून सबंध महाराष्ट्र राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा या मनुवादी संघटनेवर तात्काळ बंदी घालावी, तसेच या संघटनेवर फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात आली आहे.
मंगळवार दि.२५ जुलै रोजी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्यात यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आनंद लोंढे, पंढरपूर शहर अध्यक्ष अमोल घोडके यांच्यासह या पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
समाजात जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न,
हिंदू युवा वाहिनी सारख्या संघटनेकडून होत आहेत.
सरकारने या संघटनेवर तात्काळ बंदी घालावी, आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात आली आहे. अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.