सामाजिक

शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा

आ. समाधान आवताडे यांचे प्रशासनाला आदेश

पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील तावशी, एकलासपूर, अनवली तसेच मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, खुपसंगी, मारापुर, अकोला, हाजापुर, पाटखळ या भागात अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी,आ.समाधान आवताडे यांच्याकडून करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घरावरील तसेच शाळेवरील पत्रे वाऱ्याने उडून गेले आहेत. सोमवारी आ. अवताडे यांनी या शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि नुकसानाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

या वादळामुळे व अवकाळी पावसामुळे अनेक भागात फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर संपूर्ण केळी भागांचे नुकसान झाले आहे. एकही खोड जिवंत राहिले नाही. केळी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आ. अवताडे यांनी धीर देत, प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. या नागरिकांना शासनामार्फत शक्य तेवढी अधिकची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर यांचेसह इतर मंडळी व संबंधित गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close