
पंढरपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे यांनी गेल्या तीस वर्षात सत्ता असूनही, विकासकामे न केल्याने, उमेदवारीसाठी पवार साहेबांचे उंबरे झिजवण्याची वेळ आली. मात्र त्यांना तरीही संधी मिळाली नाही. गेल्या तीस वर्षांत सत्ताधारी लोकांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात माढ्यात असंतोषाची लाट असून, लवकरच माढ्यामध्ये परिवर्तन होणार असल्याचे मत अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते -पाटील तसेच माळशिरस मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, बप्पा देशमुख, ज्योतीताई कुलकर्णी, मदन पाटील, भगत सर, आबासाहेब साठे, भारत पाटील, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, प्रताप पिसाळ, प्रशांत पाटील, औदुंबर महाडिक, सुवर्णा शिवपुजे, ऋतुजा सुर्वे, रत्नप्रभा जगदाळे हे उपस्थित होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अभिजीत पाटील यांनी या सर्वांच्या तसेच हजारो मतदारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यातील उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम होता. मात्र श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता, तुतारीची उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेत माढ्यातील गुंता सोडविला आहे. या मतदारसंघातून आ. बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे हेही इच्छुक होते, मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवार गटाने माढ्यातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सध्या या मतदारसंघात तुतारी चिन्हाची क्रेझ असल्याने अभिजीत पाटील यांच्यासाठी ही लढाई सोपी असल्याचे मानली जात आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अभिजीत पाटील यांनी उपस्थित लोकांना संबंधित करत गेल्या ३० वर्षांपासून माढ्यातील लोकांमध्ये अन्यायाची भावना असून त्याविरोधी लाट असल्याचे सांगितले. तसेच या विरोधात सक्षम उमेदवार नसल्याने आजवर लोकांचा नाईलाज होता. मात्र आता त्यांना सक्षम नेतृत्व मिळाल्याने लोकांसमोर एक पर्याय उभा राहिला आहे. त्यामुळे यंदा सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर त्यांनी विरोधी उमेदवार रणजीतसिंह शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडत, गेल्या ३० वर्षाच्या काळात माढा तालुका वैद्यकीय सेवा सुविधा, तसेच शिक्षण क्षेत्रात मागे का राहिला? याबाबत जाब विचारला. सोबतच ही साखर कारखान्याची निवडणूक नसून ही आमदारकीची निवडणूक असल्याने, विरोधकांनी आमदारकी व विकासावरच बोलावे. कारखान्याबाबत बोलणार असाल तर तुमचं सगळच माझ्याकडे असून, परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा सूचक इशाराही त्यांनी शिंदेंना दिला. यावेळी अभिजीत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी पंढरपूरसह माळशिरस तालुक्यातील हजारो लोक उपस्थित होते.