प्रचंड शक्तीप्रदर्शन, अफाट जनसागर, ढोल ताशांचा गजर !
शिवसेना (उबाठा) उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पंढरपूर (प्रतिनिधी)
अफाट जनसागर, ढोल ताशांच्या गजरात, उबाठा शिवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. या जमलेल्या जनसमुदायाने दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यावरील प्रेम सांगोला तालुक्याला दाखवून दिले.
सांगोला मतदारसंघ आ. शहाजीबापू पाटील यांच्या फुटीरतावादी धोरण आणि फटकळ वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. या मतदारसंघात
काहीतरी चमत्कार घडणार असल्याच्या
चर्चा रंगू लागल्या होत्या. अचानक उद्धव ठाकरे शिवसेनेने आ. शहाजीबापू पाटील यांचे सहकारी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी देऊन, सांगोल्याच्या मैदानात उतरवले,
आणि या मैदानाला कुरुक्षेत्राचे रूप आले.
सोमवारी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी साळुंखे पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. सुमारे ३० ते ३५ हजारांचा जनसमुदाय सांगोल्यात जमा झाला. ढोल ताशे आणि हलग्यांच्या कडकडाटात हा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या समवेत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेतेमंडळी उपस्थित होती.