
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्री बनवण्याचे फोन येऊ लागले आहेत. TDP, LJP (R) आणि JDU सारख्या पक्षांच्या खासदारांना फोन आले आहेत. टीडीपी खासदार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी आणि किंजरापू राम मोहन नायडू यांना मंत्री होण्यासाठी फोन आला आहे. याशिवाय जेडीयूचे राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांनाही मंत्रीपदासाठी फोन आला आहे. या सर्व नेत्यांचा मोदी ३.0 मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली आहे. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. त्यानंतरच नावे फायनल झाली असून, आता कॉल्स येऊ लागले आहेत. या लोकांना आजच शपथही घेता येईल.
राज्यात १० वाजेपर्यंत ५ जणांना फोनाफोनी
दरम्यान, राज्यातून आज (९ जून) सकाळी दहावाजेपर्यंत तिघांना फोन आला असून, यामध्ये अपेक्षेनुसार नितीन गडकरी, पियूष गोयल आणि रक्षा खडसे यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव याना संधी देण्यात आली आहे. रामदास आठवले यांनाही मंत्रिपदासाठी कॉल आला आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनाही मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरु असताना अद्याप त्यांना सुद्धा मंत्रिपदासाठी कोणताही कॉल आला नसल्याचे समोर आलं आहे.