
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथे जमिनीवर बोगस वारस नोंद चढविण्यात आली असून , याबाबत घुमजाव करणाऱ्या प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. पंढरपूर तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू असून, याबाबत प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथे सैनिकांना
मोफत जमीन देण्यात आली होती. येथील गट नंबर ७८ मध्ये लक्ष्मण कृष्णा साळुंखे यांना जमीन मिळाली होती. परंतु त्यांचे वारस म्हणून लक्ष्मण रामचंद्र साळुंखे
यांच्या वारसाची वारस नोंद लावण्यात आली आहे. हा प्रकार बोगस असून जमीन लाटण्याचा प्रयत्न आहे. याप्रकरणी
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु काहीही उपयोग झाला नाही, अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते अतुल कृष्णराव कारंडे यांनी दिली आहे.
सदर बोगस वारसदार यांनी कारंडे यांच्या जमिनीवर कब्जा केला आहे, यावरून हे प्रकरण उजेडात आले आहे. महसूल प्रशासन हे मालमत्तेचे रक्षण करणारे असते, परंतु काही स्वार्थी नागरिक आणि लोचट अधिकारी हे एकत्र आल्यास असे प्रकार घडू शकतात, हे पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथील घटनेने समोर आले आहे.
दरम्यान उपोषण करते अतुल कृष्णराव कारंडे यांनीही वारस नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी, प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.