
शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. यामुळे अखंड ज्ञानावर माझी श्रद्धा आहे, शिक्षक ही ज्ञानाने भरलेली विहीर आहे, त्याच्या कार्यकाळात
यशस्वी नागरिक घडत असतात, शिक्षकाने सेवानिवृत्तीनंतरही हे कार्य अखंडपणे सुरू ठेवावे, याचा फायदा विद्यार्थी आणि समाजास नक्कीच होईल, असे प्रतिपादन उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ येथील सेवानिवृत्ती सत्कार समारंभप्रसंगी केले. यावेळी राज्य बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्यामराव जवंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मोहोळ येथील फाटे मंगल कार्यालयात येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बाळासाहेब कारंडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राजू खरे उपस्थित होते.
सेवानिवृत्तीनंतरही आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला आणि विद्यार्थ्यांना होण्यासाठी शिक्षकाने कार्यरत राहणे गरजेचे आहे. सेवेत असताना जीवनातील तत्त्वज्ञान, कामावरील निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे आदर्श समाज निर्मितीस हातभार लावला जातो. शिक्षण क्षेत्र हे पवित्र कार्यक्षेत्र आहे, असे प्रतिपादन मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी खरे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून, दीप प्रज्वलन करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब कारंडे यांचा सन्मान मोठ्या थाटामाटात करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समाजसेवक राजाभाऊ खरे हे मोहोळ मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवीत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमासंदर्भात कौतुक केले. जलदूत आमदार खरे असे नारेही उपस्थित नागरिकांकडून देण्यात आले.